डिजिटल गुरू मंत्र प्रकल्प
अनपेक्षित अशा टाळेबंदीच्या काळात सगळ्याच क्षेत्रांप्रमाणे शिक्षणक्षेत्रावरही खूप मोठा परिणाम झाला. प्रत्यक्ष शिक्षण अशक्य झाल्याने मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने सुरुवात झाली. आतापर्यंत तंत्रज्ञानाची फारशी गरज न लागल्याने शिक्षकांना ही तंत्रे अवगत नव्हती, त्यामुळे त्यांना हे काम अवघड जात होते.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या लिटरसी चेअर स्वाती हेरकल यांनी व्हाट्सअप व्हिडिओच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचं ऑनलाइनशिबिर ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला डिस्ट्रिक्ट 3131 यांनी हा प्रकल्प करण्याचे ठरवले. डी जी रश्मी कुलकर्णी, डी एल सी सी सुबोध मालपाणी आणि डायरेक्टर दीपा भागवत यांच्या नेतृत्वाखाली डिस्ट्रिक्ट टीमने तीन महिने जोरदार तयारी केली.
सर्व क्लब कामाला लागले आणि 35000 शिक्षकांनी नाव नोंदणी केली. ग्रामीण आणि शहरी भागात शिक्षणाधिकाऱ्यांना प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यांनीही प्रकल्पाला मोलाची मदत केली. एकूण 108 क्लब आणि 300 व्हाट्सअप ग्रुप मधून- 15 डिजिटल तंत्रे, पाच दिवसात- मराठी आणि इंग्लिश व्हिडिओच्यामार्फत- सर्वांना शिकवण्यात आली. गुगल क्लासरूम बनवणे, स्वतःचा यूट्यूब चैनल बनवणे ही शिकवलेल्या तंत्राची काही उदाहरणे.
रोटरीच्या काही सभासदांनीही प्रकल्पाचा लाभ घेतला. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा होऊन 40 टक्के किंवा अधिक गुण मिळवणाऱ्या सर्वांना ऑनलाइन प्रशस्तिपत्रे देण्यात आली.
भारताच्या इतर राज्यातून तसेच मॉरिशस, दुबई, फिलिपिन्स अशा देशातूनही शिक्षकांनी प्रकल्पाचा लाभ घेतला. घरबसल्या, आपल्या वेळेनुसार, काळाची गरज असलेले मोफत शिबिर- असे याचे थोडक्यात वर्णन करता येईल. शिक्षकांनीही रोटरी टीमचे आभार मानणारे शेकडो संदेश पाठवले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रमुख तत्त्वांमध्ये, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे एक प्रमुख तत्व आहे. रोटरीने ही गरज ओळखून या प्रकल्पाचे नियोजन केले व आपला खारीचा वाटा उचलला ही समाधानाची गोष्ट आहे.
रोटरी क्लब पुणे मेट्रोतर्फे सौ संगीता सोनटक्के यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले. रवींद्र मेहेंदळे, ज्योती बोकील आणि पूर्णिमा हळबे या टीमने तसेच क्लबच्या सभासदांनी आपल्या ओळखीच्या शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांना प्रकल्पाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
साडेतीनशे शिक्षकांनी मेट्रो क्लबतर्फे प्रकल्पाचा लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले. क्लबचे अध्यक्ष मकरंद फडके, प्रोजेक्ट डायरेक्टर शार्दुल गांधी, तसेच माजी अध्यक्षा पद्मा शहाणे व अंजली सहस्त्रबुद्धे यांच्या प्रोत्साहनामुळे एक छान प्रकल्प यशस्वी झाला.