From the President’s Desk
by President Sneha Subhedar

Members Forum

आजीच्या आठवणी

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात कथेकरी आले होते. त्यांनी गोष्टी सांगायची आपली परंपरा पुन्हा चालू करण्यासाठी काही उपाय सुचवले. त्यामध्ये त्यांनी घरातल्या ज्येष्ठ मंडळींशी नक्की गप्पा गोष्टी करा, त्यांचे अनुभव जाणून घ्या याचे आवाहन केले. काय सुंदर कल्पना आहे ! आज आपल्याला गोष्टी ऐकण्यासाठी, टीव्ही, सिनेमा, युट्युब सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्या सगळ्यांमध्ये आजी आजोबांकडून त्यांच्या गोष्टी ऐकण्याचे राहून जाते. मला माझ्या आजीची मूर्ती डोळ्यासमोर आली. छोटीशी, बारीक, पांढरे भुरे केसांची नाजूक ठेवणीची सत्तरीतील माझी आजी कणखर होती. आमच्या बरोबर कॅरम बॅडमिंटन खेळायची. आम्हाला, घरातल्या मुलांना तिच्याबद्दल कुतूहल होते. तुम्ही लहान असताना ब्रेकफास्ट काय करता असे आम्ही ब्रेड खात तिला विचारले तर “आमच्या लहानपणी आम्ही मऊ दूध भात खात असू ब्रेड नव्हताच मुळी” असे ती सांगायची.

खरंतर साम्राज्यवादी प्रवृत्तींशी लढणारी ही पिढी, घराघरात खूपच रोचक गोष्टी असतील. मला माझ्या आजीनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या, मजेदार! पण मी आता लिहून नाही ठेवल्या तर विस्मृतीत जाणार आणि मग आपले पूर्वज कोण, त्यांचे राहणीमान काय ह्याचा शोध घेताना आपल्याला दुसऱ्यांच्या स्मृतीवर अवलंबून राहावे लागणार, म्हणून हा खटाटोप.

माझ्या आजीचा (कवयित्री पद्मा गोळे – माझ्यासाठी मां ) जन्म तासगावचा. पटवर्धनांच्या मोठ्या वाड्यात ती वाढली. साहजिकच ह्या तटाबुरुजाच्या वाड्याच्या आठवणी तिने मला सांगितल्या. पेशव्यांचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगावचा वाडा एका मुसलमान सरदाराकडून जिंकून घेतला.  ह्या वाड्याची तटबंदी करताना काही आख्यायिका निर्माण झाल्या होत्या.   त्यात एक अशी की बुरुज बांधताना आधी एका बाळबाळंतीणीचा बळी दिला होता. माझी आजी लहान असताना बुरुजात रहाणारी एक बाई, जी त्यांच्याकडे काम करायची, ती त्यांना सांगत असे की अनेकदा रात्री एक बाई अंगाई गाताना तिथे ऐकू येते. तसाच तटावरच पीर, एकदा तिच्या आईला दिसला होता म्हणे. पण तो वाड्याचा रक्षणकर्ता आहे. म्हणून त्याला घाबरायचे नाही असे आईने सांगितले होते. अश्या भुतांच्या गोष्टी ऐकून मांला भूत दिसले नाही तर नवलच.  

माझ्या आजीची भावंड आणि ती तासगावला शाळेत जात नसत. घरीच मास्तर शिकवायला येत. पहिल्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात त्यांची शिकवण चालत असे. एकदा शिकवणी सुरु असताना माझी आजी खालच्या मजल्यावर जायला लागली तर जिन्याजवळ पॅसेजमध्ये तिला एक बाई उभी दिसली. हिरवं लुगड, केस मोकळे आणि कपाळभर कुंकू. मां नी तिला विचारले कोण तू? तर काही उत्तर नाही. मां ने मास्तरांना सांगितले. पण ते काही बघायला आले नाहीत. पण मां च्या धाकट्या बहिणीने मात्र तिला बघितले. दोघींना ती बाई परत कधीच दिसली नाही. त्यांना मात्र खात्री होती की त्यांनी भूत बघितले. ही गोष्ट मी मां च्या बहिणीकडून सुद्धा ऐकली आहे.

तासगावच्या वाड्याच्या फक्त भुताटकीच्या गोष्टी नव्हत्या, त्या एक सुंदर घराच्या आठवणी होत्या. मां नी आम्हांला त्या वाड्यातील खोल्यांबद्दल, तिथे राहणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा सांगितले होते. अनेक चित्रे आणि आरसे असलेली खोली म्हणजे आरसेमहाल. बारा दारांची खोली बारद्वारी, ही तिची आवडीची ठिकाणे. त्यांच्याकडे हरीण पण होते. बहुतेक काळवीट असावे. काळवीटनी बारद्वारीतून टाकलेली उडी तिला नेहमीच अचंबित करत असे. सगळ्या भावंडाना त्यांच्याकडे बघणाऱ्या एका गड्याने नावे दिली होती. मांच्या मोठ्या बहिणीला इंदू राजे आणि धाकट्या बहिणीला फिल्ड मार्शल अशी नावे होती. मां ला मात्र तो सख्ख सोनं म्हणायचं म्हणून मां रागवायची पण खरचं मां म्हणजे मराठीला  लाभलेले सख्खे सोनेच! पुढे एकदा मांच्या तासगावच्या वाड्याला भेट द्यायचा योग आला आणि ऐकलेल्या गोष्टींना मूर्त स्वरूप मिळाले.

मां च्या कवितामधून देशप्रेम व्यक्त होताना दिसतं. तिला स्वातंत्र्यमुक्तीच्या चळवळीसाठी काही तरी करावे असे नेहमी वाटत असे. तिची अगदी पहिली आठवण मला सांगितलेली म्हणजे एका मुंजीच्या प्रसंगाची. कोणाची मुंज कुठे झाली आता आठवत नाही. पण ती लहान असताना जबरदस्तीने लष्कर भरती केली जायची. असच एकदा सर्व कुटुंब मुंजीला गेले असताना लष्कर भरती झाली. बऱ्याच तरुण मुलांना पकडून घेऊन गेले आणि मुंज अर्धवट सोडून तिला आणि भावंडाना घेऊन कोणीतरी लपून बसले होते. ही आठवण मां नी तिच्या पहिल्या आठवणीतली एक म्हणून सांगितली होती. कदाचित हा तिच्या देशप्रेमातील पहिला दुवा असावा.

पुढे शाळेत, पन्ना दाईवर नाटक लिहून ते लिखाणातही आले. 

नंतर अच्युतराव पटवर्धन भूमिगत असताना आपण त्यांना मदत करावी हा तिचा प्रस्ताव घरी मान्य झाला नाही ह्याची हळहळ तिने व्यक्त केली होती. अतिशय कुलीन घरंदाज वातावरणात वाढलेली “झाले विलीन आमुचें व्यक्तिमत्त्व घराण्यात” म्हणणारी  मां, तिच्या बंडखोर स्वभावाचा परिचय, तिच्या “रिता घट सखे भरला ग” ह्या कवितेत देते. “हाकरिता तो स्वर आला अन खुशाल मी अनुसरले गं, शिरले डोही उरे न पर्वा तरले वा नच तरले गं”! तसचं गोवा मुक्ती साठी अनेक लोक गोव्याच्या सीमेवर जात. त्यांना पुढे गोव्यात जाता येत नसे. पुढे गेले तर त्यांना पोर्तुगीज सैनिक लाठीचा मार देत असत किंवा गोळ्या घालीत असत. मार खात असलेल्या लोकांची शुश्रुषा करणाऱ्यांच्या पथकात मां होती. तिच्या डोळ्यासमोर पडलेले हिरवे गुरुजींची गोष्ट ती मला सांगत असे.

मां च्या शिक्षकांमध्ये बाळूताई खरे (मालतीबाई बेडेकर) हे नाव बरेचदा यायचे. त्यांनी तिला लेखनासाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल ती नेहमीच बोलत असे. मां नी SNDT तून बी.ए. केले आणि पुढे एम. ए. वामन मल्हार जोशी आणि गं. बा. सरदारांसारखे दिग्गज तिला शिकवायला होते. पण एका प्रोफेसरांची मजेदार आठवण तिने सांगितली होती. ह्या प्रोफेसरांचा प्रेमभंग झाल्यामुळे त्यांचा सर्व मुलींवर राग होता म्हणे. त्यांच्या तासाला विद्यार्थीनीना मान वर करून बघायची परवानगी नव्हती. एकदा मां ने खिडकीतून पाउस बघायचे धाडस केले आणि त्या प्रोफेसरांनी तिला वर्गातून बाहेर जा सुनावले. तेव्हा पासून ती त्या प्रोफेसरांच्या वर्गात कधीच गेली नाही. तसेच एक प्रसिद्ध कवी आमच्या शनिवार पेठेतल्या वाड्यात नेहमी येत असत. एकदा बोलता बोलता ते थेट स्वयंपाकघरापर्यंत आले. मां ला ते आवडले नाही. तिने त्यांना दिवाणखान्यातच बसायला सांगितले. तिचा स्वभाव अलिप्त होता. तिने ठरवले की लक्ष्मणरेषांच्या मर्यादा ओलांडून कोणी आत येऊ शकत नव्हते.!

माझ्या आजीच्या आठवणीतील बहुतेक लोकांना मी बघितले सुद्धा नाही. काही नावे ऐकली होती पण तिच्या ह्या आठवणी खूप करमणूक करायच्या, न कळत काही दाखवून जायच्या, काही शिकवून जायच्या. आयुष्यभर सोबत केली तिच्या ह्या आठवणीनी. आता विस्मृतीत जाणाऱ्या त्या काळाच्या आणि त्या काळातील माणसांच्या आठवणी म्हणूनच लिहून ठेवल्या माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी!

By Rtn. Rajas Phadke

 

DISTRICT NEWS 

Rotary Club of Pune Metro’s

Interact Journey 2021-22

Club Projects and Activities

HIV+ वधूवर सूचक

विवाह मेळावा

HIV बाधीत वधूवर सूचक विवाह मेळाव्याची convenorship ही मी रोटरीत पाऊल ठेवल्यानंतरची माझी पहिलीच मोठी जबाबदारी! हा उपक्रम Rotary Club of Pune Metro, मानव्य, Rotary club of Pune Mid east, अक्षदा विवाह संस्था व KMP संस्था गेली बारा वर्षे सातत्याने राबवत आहेत. या प्रोजेक्टसाठी अनेक रोटरी मेंबर्सनी आपण होऊन पुढे होऊन मदत केली. कुठेही मला काम करताना नवखेपणा जाणवू दिला नाही. एक प्रकारचा कॉन्फिडन्सच दिला असंच म्हटलं पाहिजे. Team-work चा हा उत्कृष्ट नमुनाच!!

या वर्षी आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या त्या चक्क District 3131 च्या First Lady – Rtn. सौ प्रिया शहा. त्यांचं या कार्यक्रमासाठी येणं ही तर संपूर्ण टीम साठी फार महत्त्वाची गोष्ट होती. आमचा त्यामुळे कामाचा उत्साह द्विगुणित झाला.

रो.  प्रियाताई या एकत्र कुटुंबात वावरणाऱ्या, त्यामुळे, रोटरी हे आपलं कुटुंब आहे, त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागणं, तसेच प्रत्येकाचा प्रोजेक्ट करताना उत्साह वाढवणारा त्यांचा स्वभाव माझ्यासारख्या अगदीच नवख्या व्यक्तीलाही लगेच जाणवला.

सगळ्यांच्या आयुष्यात मांगल्याचा, आनंदाचा, विश्वासाचा दिवा तेवत राहो ह्या सदिच्छा मनात बाळगून या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

सुरुवातीला मानव्य संस्थेचे अध्यक्ष व आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे रोटेरियन श्री. शिरीष लवाटे यांनी संस्थेची 

व ह्या उपक्रमाची माहिती दिली. ते बोलताना म्हणाले की “जरी हा HIV बाधित वधू वर सूचक विवाह मेळावा दरवर्षी  भरवत असलो तरी माझी अशी इच्छा आहे की अशी वेळ यावी की असे कार्यक्रम घ्यायची गरजच पडू नये”.  खरोखर किती उदात्त विचार आहे हा!! त्यानंतर अक्षदा विवाह संस्थेचे डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी आलेल्या उमेदवारांना विवाहातील कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “आपण आपली माहिती संपूर्णपणे खरी द्या. तरच विवाह हे यशस्वी होतात. विवाह झाल्यावर विवाह नोंदणी  देखील अवश्य करा. ‘विश्वास’ हाच प्रत्येक नात्याचा पाया असतो आणि त्यामुळे कुठेही खोटेपणा नसावा”.

जेव्हा आमच्या पुणे मेट्रोच्या प्रेसिडेंट रोटेरियन सौ स्नेहा सुभेदार बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या मनोगताने उमेदवारांना एक सकारात्मकता दिली. त्या म्हणाल्या की, आयुष्य हे सुंदर आहे. मनात सकारात्मक विचार ठेवून आयुष्याला सामोरे जा.

यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रोटेरियन सौ प्रियाताई शहा यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. “रोटरी जे अनेक सेवाभावी उपक्रम करत असते त्या उपक्रमातील हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. जात-पात, सुंदर-कुरूप या सारख्या  क्षुद्र विचारांना थारा न देता आपला जोडीदार निवडा, आणि आयुष्यातल्या संकटांना एकमेकांच्या साथीने मात देत आनंदी आयुष्य जगा”, असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.

कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली. आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ पुणे मिड ईस्ट च्या रो.श्री सतिश भोपटकर यांनी केले.

ह्या project च्या नंतरच्या टप्प्यांत आलेल्या उमेदवारांचे Bio-data वाचन झाले. कित्येक निष्पाप चेहरे स्टेजवर येत होते. 

त्यात काही कोवळ्या वयातील विद्यार्थी होते, काही शेती करणारे, काही दूध व्यवसाय करणारे,मोबाईल रिपेयरिंगचं दुकान चालवणारे, शिवणकाम, हात- मजूरी करून पोट भरणारे होते. काहींना आई-वडील, भाऊ-बहीण कुणीच नव्हतं तर काही सुशिक्षित व चांगल्या आर्थिक परिस्थितीतील उमेदवारही होते. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आगतिकता होती, डोळ्यांत भविष्याची स्वप्नही होती, आयुष्य चांगल्या साथीदाराच्या मदतीने जगायची उमेदही होती. एका बेसावध क्षणाला बळी पडलेले हे दुर्दैवी जीव होते. त्यांना प्रेमाच्या, आपुलकीच्या आधाराची आस होती. रोटरी क्लब ही गरज ओळखून मदतीचा हात आपल्या ह्या समाज बांधवांसाठी पुढे करतोय आणि आपण अशा आंतरराष्ट्रीय संस्थेचा भाग आहोत, त्यामुळे आपल्याला हा खारीचा वाटा समाजासाठी उचलता येतोय, हे समाधान माझ्या मनात उमटत होतं.

कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला होता. जेवण, उमेदवारांचे परस्पर परिचय व संवाद चालू होते. मी मात्र हॉलमध्ये बसून शांतपणे त्यांचे चेहरे न्याहळत होते.

मनासारखा जोडीदार न मिळाल्याने काही उदास होते, तर मनासारखा साथीदार मिळाल्याचा आनंद काही जण चेहऱ्यावर लपवू शकत नव्हते. जीवनातील कडू-गोड प्रसंगांची मी साक्षीदार होत होते.

हॉल मधून बाहेर पडताना रो.शिरीष ह्यांचे एकच वाक्य मनात रुंजी घालत होते. “या कार्यक्रमाची गरजच पडू नये इतकं या आजाराचं निर्मूलन व्हावं”.

सरतेशेवटी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला, “बाप्पा, सर्वांना खूप चांगलं आरोग्य दे, सद्बुद्धी दे, चांगल्या विचारांची माणसं आजूबाजूला दे”- अशी प्रार्थना करत मी घराची वाट धरली…

By Ann Anuradha Puntanbekar

CLUB MEETINGS